जिल्हा परिषद संवर्गातील कनिष्ठ सहायक पदाचे सुधारित सेवा प्रवेश नियम तसेच परिचर संवर्गाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटनेच्या वतीने येत्या 7 सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे.
संघटनेतर्फे वारंवार प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मागणी शासनाकडे करण्यात आली;पण शासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. विविध संवर्गातील वेतन त्रुटी तसेच जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत कर्मचार्यांना ज्या प्रकारे शैक्षणिक अर्हतेनुसार समायोजित केले जाते त्याप्रमाणे परिचर संवर्गातील कर्मचार्यांचे समायोजन करण्यात यावे,लिपिक या पदाचे सुधारित सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध करून तीन वर्षांचा कालावधी ओलांडला आहे. त्यामुळे लिपिक पदाचे सुधारित सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध करावे यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटनेच्या वतीने 7 सप्टेंबरला काळ्या फिती लावून आंदोलन करून ग्रामविकास विभागाचे लक्ष वेधले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटनेचे औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी युसूफ सय्यद यांनी दिली.